जीवनाचे गाठोडे... Marathi Story | कथा
एक व्यक्ती आपल्या जीवनातील अडचणींनी पूर्णपणे त्रस्त झाला होता. दिवसरात्र चिंता करताना त्याचे कुटुंबात वाद होत होते, मुलांच्या शिक्षणाची काळजी, कामातील उतार-चढाव, आणि वृद्ध आईवडिलांच्या आजारपणाची जबाबदारी याने त्याचा जीव उबगला होता. त्याला सर्वत्र अंधारच दिसत होता, आणि या अडचणींवर कोणताच उपाय सापडत नव्हता. हळूहळू त्या अडचणींच्या भाराने तो दबला आणि आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. एके दिवशी, घरी कोणी नसताना संधी साधून त्याने झोपेच्या गोळ्या घेतल्या. मरणाच्या प्रतीक्षेत, त्याच्या डोळ्यांना झोप लागली आणि त्याला स्वप्न पडले. त्याच्या आजूबाजूला एक दिव्य प्रकाश पसरला होता, आणि त्या दिशेने पाहिले असता, तो एक तेजस्वी चेहरा दिसला – परमकृपाळू परमात्मा. तो आणि परमात्मा एकमेकांकडे पाहत होते, आणि देव म्हणाले, "माझ्या प्रिय मुला, अजून तुला बोलावलं नाही, मग का इतकी घाई करतोस?"
"प्रभू, मला माफ करा, पण मला आता काहीच करण्याची ताकद राहिली नाही. या संसाराच्या जबाबदाऱ्यांनी माझं गाठोडं खूप जड झालं आहे," असे तो म्हणाला. भगवान हसले आणि म्हणाले, "तुला मी नेहमीच सांगितलं होतं की, तुझ्या चिंता माझ्याकडे सोपव आणि हलका हो. का नाही तू हे गाठोडं मला सोपवत?"
"प्रभू, मला असं वाटतं की माझं गाठोडं खूप जड आहे. मी इतकं मोठं गाठोडं कुणाच्या खांद्यावर कधीच पाहिलं नाही," त्याने दुःखभरल्या आवाजात उत्तर दिलं. भगवान म्हणाले, "बाळा, प्रत्येकाला जीवनात काही ना काही ओझं उचलायला लागणारच असतं. आणि तुला जर असं वाटतंय की तुझंच गाठोडं सर्वात जड आहे, तर तू दुसऱ्याचं गाठोडं घेऊ शकतोस. बघ, या लोकांची गाठोडी इथेच आहेत." त्या माणसाने शेजारी असलेल्या व्यक्तींची गाठोडी उचलून पाहिली. त्यात त्याला एक स्त्रीचं गाठोडं दिसलं, जी वरकरणी खूप सुखी दिसत होती. पण ते गाठोडं उचलल्यावर त्याला आश्चर्य वाटलं कारण ते खूपच जड होतं. त्याने गाठोडं उघडलं आणि त्यात त्या स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायक गोष्टी दिसल्या – तिच्या पतीचा व्यसनाधीनपणा, मुलीचा कर्करोग, मुलाचा गुन्हेगारी संबंध. तो माणूस हे पाहून थक्क झाला.शेवटी तो माणूस म्हणाला, "प्रभू, मला माझं स्वतःचं गाठोडं परत द्या. आता वाटतं की तेच जास्त हलकं आहे."
भगवान त्याला समजावून सांगत म्हणाले, "बाळा, प्रत्येकाचं ओझं असतंच, पण त्यांचं गाठोडं ते माझ्याकडे सोपवतात आणि मग ते हलकं होतं. तू मात्र तुझं ओझं स्वतःच वाहत होतास." त्याला आता सर्व समजलं होतं. त्याने आपलं गाठोडं परमेश्वराच्या चरणाशी ठेवलं आणि पृथ्वीवर परत जाण्यासाठी निघाला. त्याच क्षणी, झोपेची गुंगी उतरली आणि त्याच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले.
बोध:
मित्रांनो, आपण जो आनंद जीवनात शोधतो, तो आपल्या हातात असतो. दुसऱ्यांच्या आयुष्याची तुलना करण्यात काहीच फायदा नाही. तुम्हीच ठरवा, कसं जगायचं आहे.
---
https://www.marathmoli-lekhani.live/
सदस्य, सूभाष साळवी यांनी पाठवला आहे.